लाडकी बहीण योजना कायमची बंद होणार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा; ‘केवायसी फक्त बहाणा, खरा डाव…’

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. ई-केवायसी पडताळणी मोहिमेनंतर राज्यभरातील लाखो महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली असून विरोधकांनी यावरून महायुती सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ई-केवायसी हा केवळ बहाणा असून लाभार्थी महिलांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी करून योजना बंद करण्याचा सरकारचा छुपा हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी म्हटले की, निवडणुकीपूर्वी या योजनेचे लाभार्थी सुमारे 2.47 कोटी होते. मात्र आता तब्बल 81 लाख महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही केवायसी न करता योजना राबवली आणि आता त्याच महिलांना अपात्र ठरवले जात असेल तर ही सरकारचीच फसवणूक असल्याचा दावा त्यांनी केला.

तसेच, लाडक्या बहिणींना त्रास देण्याचा किंवा त्यांच्याकडून पैसे परत घेण्याचा प्रयत्न केल्यास सरकारला त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारला वसुली करायची असेल तर ती संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांकडून करावी, महिलांना वेठीस धरू नये, असेही ते म्हणाले.

दरम्यान, ई-केवायसी आणि इतर पडताळणी प्रक्रियेनंतर राज्यभरातील सुमारे 73 ते 81 लाख अर्ज अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर दरमहा सुमारे 3,700 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडत असल्याने लाभार्थी संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
मात्र सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.