पुण्यात राष्ट्रवादीचा ‘मास्टरस्ट्रोक’; भाजपच्या माजी खासदारांच्या मुलालाच दिली उमेदवारी, पार्थ पवारांच्या निर्णयाची जोरदार चर्चा

पुणे : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असला, तरी पुण्यात घेतलेल्या एका निर्णयाने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विक्रम काकडे यांना उमेदवारी देत राजकीय वर्तुळात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

विशेष म्हणजे विक्रम काकडे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चिन्हावर भाजप नेत्याच्या मुलाची उमेदवारी हा राजकीय समीकरणांना नवा आयाम देणारा निर्णय मानला जात आहे. या निर्णयामागे पार्थ पवार यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महायुतीमध्ये 17 जागांच्या वाटपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या वाट्याला पुणे आणि रायगड या दोन महत्त्वाच्या जागा आल्या. त्यानंतर पुणे मतदारसंघासाठी योग्य उमेदवार निवडण्याची जबाबदारी पक्ष नेतृत्वासमोर होती. रविवारी रात्री पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयात जवळपास पाच तास मंथन झाले. या बैठकीत अनेक इच्छुकांच्या नावांवर चर्चा झाली.

या शर्यतीत माजी आमदार दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमेश थोरात, विलास लांडे यांच्यासह अजित गव्हाणे, रणजित शिवतारे आणि दीपक मानकर यांची नावे चर्चेत होती. मात्र सर्व अंदाज फोल ठरवत अखेर विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

विक्रम काकडे यांची ओळख केवळ भाजप नेत्याचे सुपुत्र अशी नाही, तर ते पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या उमेदवारीकडे केवळ निवडणुकीचा निर्णय म्हणून नव्हे, तर भविष्यातील राजकीय रणनीतीचा भाग म्हणूनही पाहिले जात आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस असल्याने सर्व पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने बहुतांश जागांवर उमेदवार निश्चित केले असले, तरी काही ठिकाणी नाराजी आणि बंडखोरीची शक्यता कायम आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जांनंतरही विधान परिषद निवडणुकीतील राजकीय घडामोडी अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पुण्यातील या उमेदवारीमुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणे, राष्ट्रवादीची रणनीती आणि पार्थ पवारांचा वाढता प्रभाव या तिन्ही मुद्द्यांवर आता राजकीय चर्चांना वेग आला आहे.