24 तासांत हवामानाचा मोठा पलटवार; तब्बल इतक्या जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा..


मुंबई : राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून उष्णतेची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, आता भारतीय हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना आणि जळगाव जिल्ह्यांसाठी गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांसह शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातारा, अहिल्यानगर, जळगावसह विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली असून शेती पिकांच्या नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सातारा जिल्ह्यात अचानक बदललेल्या वातावरणामुळे गारांसह जोरदार पाऊस झाला. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरातही दमदार पाऊस झाल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यांमध्येही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. भडगाव तालुक्यातील गुढे-जुवार्डी आणि आडळसे परिसरात गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पावसामुळे शेतजमिनीत ओलावा निर्माण होऊन खरीप हंगामापूर्वीच्या मशागतीला मदत होणार असली, तरी काढणी केलेला कांदा, भाजीपाला आणि उघड्यावर साठवलेला कृषी माल धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पुढील 24 तास राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वीच अवकाळी पावसाचा जोर वाढल्याने हवामानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!