तब्बल 80 लाख महिला अपात्र!! फक्त मतांसाठी झाला वापर, जयंत पाटील सरकारवर बरसले..

मुंबई : महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’तून तब्बल 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. सुरुवातीला 2.46 कोटी महिला लाभार्थी असलेल्या या योजनेतील संख्या आता 1.66 कोटींवर आली असून ई-केवायसी आणि पडताळणी प्रक्रियेनंतर मोठ्या प्रमाणावर लाभार्थी वगळण्यात आल्याचे समोर आले आहे.

या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.
जयंत पाटील यांनी “गरज सरो आणि वैद्य मरो” अशी टीका करत, लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना सरसकट लाभ देण्यात आला, मात्र आता त्याच महिलांना अपात्र ठरवले जात असल्याचा आरोप केला. राज्याची वाढती आर्थिक तूट आणि आर्थिक परिस्थिती हेच या निर्णयामागील कारण असल्याचा दावाही त्यांनी केला.

आज 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. उद्या आणखी काही लाख महिलांना विविध कारणे दाखवून वगळले जाऊ शकते. हळूहळू ही योजना बंद झाली तरी आश्चर्य वाटणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच शासनाने सुरुवातीपासून योग्य नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती, असा टोला देखील त्यांनी लगावला.

दरम्यान, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील महिलांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत सुरुवातीला पात्र ठरलेल्या सर्व महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत देण्यात येत होती. मात्र नंतर पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात आल्यानंतर अपात्र लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात समोर आली. त्यानंतर छाननी करून लाखो महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.