महत्त्वाची बातमी! जूनमध्ये तब्बल 11 दिवस बँका बंद; कामे अडकू नयेत म्हणून सुट्ट्यांच्या तारखा आताच नोट करा


नवी दिल्ली : जून 2026 मध्ये बँकिंगसंबंधित महत्त्वाची कामे असतील तर ग्राहकांनी आधीच नियोजन करून ठेवणे आवश्यक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जून महिन्यातील बँक सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून विविध सण, प्रादेशिक उत्सव तसेच शनिवार-रविवारच्या नियमित सुट्ट्यांमुळे देशातील अनेक भागांमध्ये बँका एकूण 11 दिवस बंद राहणार आहेत.

खाते उघडणे, कर्ज प्रक्रिया, धनादेश क्लिअरन्स, डिमांड ड्राफ्ट काढणे किंवा इतर महत्त्वाच्या बँकिंग सेवांसाठी शाखेत जाण्याचा विचार असल्यास सुट्ट्यांची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.

सुट्ट्यांमुळे शेवटच्या क्षणी अडचण निर्माण होऊ शकते. आरबीआयच्या कॅलेंडरनुसार 7, 14, 21 आणि 28 जून हे रविवार असल्याने बँका बंद राहतील. तसेच 13 जून हा दुसरा शनिवार आणि 27 जून हा चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना नियमित सुट्टी असेल.

याशिवाय काही राज्यांमध्ये स्थानिक सण आणि धार्मिक उत्सवांमुळे अतिरिक्त सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 15 जून रोजी YMA Day आणि राजा संक्रांतीनिमित्त आइझॉल व भुवनेश्वर येथे बँका बंद राहतील. 25 जून रोजी मोहरमनिमित्त विजयवाड्यातील बँकांचे कामकाज ठप्प राहणार आहे.

त्यानंतर 26 जून रोजी मोहरमच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, पाटणा आणि श्रीनगरसह अनेक प्रमुख शहरांतील बँकांना सुट्टी असेल. 29 जून रोजी संत गुरु कबीर जयंतीनिमित्त शिमला येथे बँका बंद राहतील, तर 30 जून रोजी रेमना नी उत्सवानिमित्त आइझॉलमधील बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत.

मात्र, शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना डिजिटल बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार आहे. मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, UPI, NEFT, RTGS आणि IMPS यांसारख्या सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

तसेच एटीएम सेवाही उपलब्ध असल्याने रोख रक्कम काढणे किंवा शिल्लक तपासणे यांसारखी कामे सहज करता येतील. तथापि, लॉकर सेवा, खाते उघडणे, कर्ज अर्ज किंवा शाखेत प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असलेल्या सेवांसाठी ग्राहकांनी सुट्ट्यांचे वेळापत्रक तपासूनच बँकेला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!