विषारी दारूकांडानंतर प्रशासनाचा मोठा झटका! एका रात्रीत 21 जण निलंबित; पुण्यातील ‘दारू रॅकेट’वर कारवाईचा बडगा

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडानंतर प्रशासनाने मोठी कारवाई करत एका रात्रीत तब्बल 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. बेकायदा दारू विक्री, वाहतूक आणि उत्पादनाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत ही धडक कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या दोन दिवसांत हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी गावठी दारू पिल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 ते 5 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण भागात तयार होणारी विषारी गावठी दारू मोठ्या प्रमाणावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पुरवली जात होती. विशेष म्हणजे, या बेकायदा धंद्याविरोधात काही सामाजिक संघटना, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. अनेक वेळा पुरावेही सादर करण्यात आले होते. काही प्रकरणांमध्ये विषारी दारूने भरलेली वाहने पकडून दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, मुख्य सूत्रधारांवर कारवाई करण्यात टाळाटाळ झाल्याचा आरोप होत आहे.

या पार्श्वभूमीवर, “जर दोन महिन्यांपूर्वीच या रॅकेटवर कठोर कारवाई झाली असती, तर आज या लोकांचे प्राण वाचले असते,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या घटनेनंतर प्रशासनाने जबाबदारी निश्चित करत पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील 8 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी विभागातील तब्बल 13 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये पुण्यातील ‘J’ आणि ‘F’ विभागातील काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
विषारी दारूकांडानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आला आहे. पुणे परिसरातील बेकायदा दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या धडक कारवाईदरम्यान सुमारे 600 लिटर मिथेनॉलमिश्रित घातक दारू जप्त करण्यात आली आहे. ही दारू बाजारात पोहोचली असती तर आणखी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी, पुरवठादार आणि संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुण्यातील या दारूकांडामुळे बेकायदा दारू व्यवसाय आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.