४ वर्षांपूर्वी केला दुसरा संसार, पण सावत्र मुलासोबत जुळले प्रेमसंबंध; दुर्दैवी शेवटाने बीड हादरलं

बीड : केज तालुक्यातील एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सावत्र आई आणि तरुण मुलाच्या कथित प्रेमसंबंधांमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील सोनी जवळा येथील एका कुटुंबातील 21 वर्षीय तरुण आणि त्याची सावत्र आई काही दिवसांपूर्वी घर सोडून गेल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना परत गावी आणले.
गावी परतल्यानंतर संबंधित तरुणाने विषारी पदार्थ सेवन केल्याची माहिती आहे. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, तरुणाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर संबंधित महिलेनेही अंबाजोगाई येथील रुग्णालय परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला.

या दुहेरी मृत्यूच्या घटनेमुळे केज आणि अंबाजोगाई परिसरात खळबळ उडाली असून नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत.