पैसे गुंतवू नका, परत मिळणार नाहीत; लॉकडाऊनसारखी परिस्थिती येणार; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ…

मुंबई : वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि देशातील आर्थिक परिस्थितीवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यापासून नागरिकांनी सावध राहावे. भविष्यात लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले की, असलेले पैसे सुरक्षित ठेवा. सध्या कुठेही मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक परिस्थिती चिंताजनक असून बँकिंग व्यवस्थेवरही ताण वाढत आहे. तसेच देशात केवळ इव्हेंटबाजीवर भर दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. भाजपचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नसल्याने विविध चर्चांना उधाण आल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, कल्याणमधील बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी देशात धार्मिक ध्रुवीकरण वाढत असल्याचा आरोप केला. “जनतेच्या भावना भडकवून तणावाचे राजकारण केले जात आहे, तर महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका त्यांनी केली.
