महिलांना शेतकरी म्हणून दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ; उरुळीकांचन येथे’ महिला उन्नत वारी २०२६’ उपक्रमाचा आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ…..

उरुळी कांचन : महिला सक्षमीकरण हे धोरण अवलंबून महिलांना स्वावलंबी करण्याचा राज्य शासनाचा मुख्य धोरणांचा उद्देश आहे. महिलांना लाडकी बहिण योजनेपासून अर्थिक स्वायत्तता मिळवून या रक्कमेतून गरजांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारने महिलांसाठी ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक -२०२६’ मंजूर केले असून महिलांना शेतकरी दर्जा मिळावा म्हणून विधेयक आणणारे महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य असून महिलांच्या नावे सातबाराउतारा नसला तरी त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना शासकीय योजना देऊन लाभ देण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

उरुळीकांचन (ता.हवेली) येथे महिला व बालविकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित “महिला उन्नती वारी २०२६” विशेष उपक्रमाच्या शुभारंभ मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते महिला व बाल विकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे दोन्ही पालखी मार्गावर जनजागृती करिता असलेल्या डिजिटल चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास आमदार माऊली कटके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, सामाजकल्याण विभागाचे सभापती जितेंद्र बडेकर,जि.प. सदस्या रुपाली झेंडे,हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे,सदस्य कोमल कांबळे,कृषिराज चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर,भाऊसाहेब तुपे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे,उपसचिव डॉ.पद्मश्री बैनाडे,जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहणी ढवळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी,अंगणवाडी सेविका,आरोग्य दूत,महिला उपस्थित होत्या.
आदिती तटकरे म्हणाल्या, राज्यात सुमारे ८०० वर्षापासून अधिक आषाढी वारीची परंपरा जोपासली जात आहे, त्यामुळे महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून खऱ्याअर्थाने ओळखली जात असल्याचे जगाला दाखवून देत असतो.वारीच्या माध्यमातून वारकरी पायी चालत चालत संतांचे विचार,संस्कृती,परंपरा समाजात पोहचवून खऱ्याअर्थाने समाज प्रबोधनाचे काम करतात.परकीय आक्रमणाच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी वारीची परंपरा जोपासत रयतेची काळजी घेतली.आषाढी वारीमध्ये राज्यभरातून लाखो वारकरी सहभागी होत असतात. या मोठ्या लोकसहभागाच्या सोहळ्यादरम्यान वारीच्या काळात महिलांना येणाऱ्या शारीरिक अडचणी विचारात घेता हिरकणी कक्ष,महिला सक्षमीकरण केंद्र,शौचालय,सॅनिटरी पॅड मशीन,आरोग्य कक्ष आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.वारीमध्ये महिलांना अधिकाधिक सुविधांचा लाभ देण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत,शौचालय,हिरकणी कक्ष आदी सुविंधाची माहिती या चित्ररथावरून प्रदर्शित करावी,महिलांचे मूलभूत अधिकार त्यांच्यापर्यंत पोचविण्याचे महिला आयोगाने काम करावे अशा सूचना त्यांनी दिले.

प्रास्ताविकात राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे म्हणाल्या, “महिला उन्नती वारी” उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश राज्यभर पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच महिला व बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना,महिलांसाठी उपलब्ध विविध हेल्पलाईन्स तसेच महिलांशी संबंधित विविध कायद्यांची माहिती व प्रचार-प्रसिद्धी करण्यात येणार आहे.तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी लोककला सादरीकरणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण,स्त्री सुरक्षा,सामाजिक प्रश्न तसेच शासनाच्या विविध योजनांवर आधारित प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी आभार मानले, आशिष जराडे यांनी सूत्रसंचालन केले.
