अपघात घडला पण कोणाचा! लोणीकाळभोर येथील अपघातात मृत्यू झालेल्या पुरुषाची ओळख पटेना ; पोलिसांसमोरच मोठे आव्हान ….


लोणी काळभोर : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वेगातील कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, मृत अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी संतोष भिमराव राठोड (वय ४१, रा. वाकड, पुणे) या कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अतुल अमृत रायबोले (वय ४०) यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास डायल ११२ वर एका नागरिकाने फोन करून लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील सेल पेट्रोलपंपाजवळील बोरकरवस्ती परिसरात अपघात झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अतुल रायबोले आणि ए. व्ही. पवार तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी सोलापूर–पुणे मार्गाच्या बाजूला एफएस टिंबर दुकानासमोर अंदाजे ३० वर्षीय अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जवळच मारुती सुझुकी कंपनीची ईर्टिगा कार क्रमांक एमएच १४ केएन ६९६८ उभी होती. कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झालेले होते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली की, संबंधित तरुण रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील कारने त्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर तरुण कारवर आपटून रस्त्याच्या बाजूला फेकला गेला.

यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणाला तातडीने विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अपघातातील मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, हरविलेल्या व्यक्तींच्या नोंदी आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू आहे.

मृत तरुणाच्या डाव्या हाताच्या दंडावर ‘ॐ’ हे चिन्ह गोंदलेले आहे, तर उजव्या हातावर गोलाकार चक्राचे गोंदण आहे. त्याचे वय अंदाजे ३० वर्षे असून उंची सुमारे साडेपाच फूट आहे. शरीरयष्टी सडपातळ आणि रंग सावळा आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कोणाच्या ओळखीची असल्यास त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे यांच्याशी ९१५८३५३६११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!