राजकारणात ‘धक्कातंत्र’! राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर? शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. अहिल्यानगरचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांना विधानपरिषदेचे तिकीट मिळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

या घडामोडींवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया देत खळबळ उडवून दिली आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना शिंदे यांनी सूचक वक्तव्य केले.
ते म्हणाले की, काही नेते पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आम्हालाही मिळाली आहे. मात्र अद्याप कोणतेही अधिकृत राजीनामा पत्र किंवा स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा चर्चा वाढणे स्वाभाविक आहे.

शिंदे यांनी पुढे सांगितले की, मागील निवडणुकांदरम्यान काही नेत्यांवर चौकशीचा दबाव होता. तसेच भाजपकडून दबावतंत्राचा वापर झाल्याचे आरोपही त्यांनी केले. काहींना मागील पोटनिवडणुकीत विविध आश्वासने देण्यात आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील महत्त्वाचे नेते असून त्यांनी 2019 मध्ये राहुरी मतदारसंघातून मोठा विजय मिळवला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, 30 मे रोजी त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता असून या प्रवेशामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसू शकतो. भाजपकडून विधानपरिषदेच्या जागांसाठी उमेदवारांची जोरदार चाचपणी सुरू असून अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे.
राजकीय घडामोडींना वेग आला असून पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.