रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री; वडापाव, समोसा आता महागणार, मध्य रेल्वेचा निर्णय…


मुंबई : मुंबईकरांचा आवडता आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा वडा पाव आता महागणार आहे. मध्य रेल्वेने रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या दरवाढीचा निर्णय घेतला असून येत्या १ जूनपासून नवीन दर लागू होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरील स्टॉल्सवर मिळणाऱ्या वडा पाव, समोसा आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सध्या १३ रुपयांना मिळणारा वडा पाव आता २० रुपयांना मिळणार आहे. तर १२ रुपयांचा समोसा देखील थेट २० रुपयांवर जाणार आहे. याशिवाय रगडा पावची किंमत २० रुपयांवरून २५ रुपये करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने वाढती महागाई, एलपीजी आणि इंधन दरवाढ यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच प्रवाशांसाठी मेन्यूमध्ये काही नव्या पदार्थांचाही समावेश करण्यात येणार आहे. स्लश ड्रिंक्स, क्रीम डोनट्स, सूप, डोसा आणि नूडल्ससारखे पदार्थ आता रेल्वे स्टॉल्सवर उपलब्ध होणार आहेत.

दरम्यान, काही खाद्यपदार्थांच्या प्रमाणातही बदल करण्याची शक्यता असून ज्यूस आणि सोडा उत्पादनांच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. वडा पाव आणि समोसाच्या दरातील वाढीमुळे मुंबईकरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!