गेम ओव्हर! पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहानचा ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये खात्मा; कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या..

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मानला जाणारा दहशतवादी हमजा बुरहान याला पाकिस्तानमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून ठार केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील मुजफ्फराबाद येथे घडल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, हमजा बुरहान मुजफ्फराबादमधील आपल्या कार्यालयात उपस्थित असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
हमजा बुरहान हा 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप होता. या भीषण हल्ल्यात भारतीय लष्कराच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला होता, ज्यात 40 हून अधिक जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती.

सूत्रांचे म्हणणे आहे की हमजा बुरहान स्वतःला पाकिस्तानमध्ये शिक्षक म्हणून सादर करत होता. मात्र 2019 नंतर तो विविध दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे आरोप सातत्याने होत होते. तसेच पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये तो दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण देत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन बालाकोट’ राबवत पाकिस्तानातील बालाकोट परिसरातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. या कारवाईत अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा भारतीय हवाई दलाने केला होता.