पुन्हा सरकारविरोधात रणशिंग! मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा एल्गार; अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाची घोषणा, सरकारचं टेन्शन वाढलं


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधत ३० मेपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात तब्बल ३ कोटी मराठे सहभागी होतील, असा दावा देखील त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा-कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून सरकारवर तीव्र टीका केली. आम्ही अडीच-तीन वर्षांपासून लढतोय, पण समाजाच्या पदरात काय पडलं? असा सवाल करत त्यांनी सरकारवर मराठा समाजाला मोठं होऊ न देण्याचा आरोप केला.

सरकार जळतंय, मराठा समाज पुढे जाऊ नये हीच त्यांची भूमिका आहे. सत्तेशिवाय नाही, तर मराठ्यांशिवाय शहाणपण चालत नाही, असे म्हणत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. भाजपमधील मराठ्यांच्या लेकीबाळींनाही आरक्षण लागणार नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

जरांगे पाटील पुढे म्हणाले, मुंबईतील लोक पुन्हा आंदोलन कधी करणार असा प्रश्न विचारत आहेत. आता आंदोलन असे करायचे की फडणवीसांना चारी दिशेला फक्त मराठेच दिसले पाहिजेत.” तसेच, “अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, त्याला फडणवीस साहेबच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी सरकारने हैदराबाद गॅझेटचा GR काढूनही अंमलबजावणी रोखल्याचा आरोप केला. मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा आहेत, असे विधानसभेत स्वतः फडणवीसांनी म्हटले होते. म्हणजे प्रमाणपत्र रोखण्यामागेही तेच जबाबदार आहेत, असे जरांगे पाटील म्हणाले.

दरम्यान, ३० मे रोजी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनासाठी मोठी तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत असून, मराठा समाज पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!