NEET पेपरफुटीचा पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लरमधून रचला गेला मोठा कट? CBI च्या तपासात समोर आली धक्कादायक पेपरफुटीची साखळी..

पुणे : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठे आणि धक्कादायक खुलासे केले आहेत. वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील या गैरप्रकाराचे धागेदोरे थेट पुण्यापर्यंत पोहोचल्याचे समोर आले असून, पुणे हेच या संपूर्ण रॅकेटचे महत्त्वाचे केंद्र असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील मनीषा वाघमारे हिची या संपूर्ण साखळीत महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासातून पुढे येत आहे.

सीबीआयच्या तपासानुसार, पेपरफुटीची ही साखळी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने देशातील विविध राज्यांमध्ये पसरवण्यात आली होती. पुण्यातून सुरू झालेला पेपरचा प्रवास थेट राजस्थानपर्यंत पोहोचल्याने तपास यंत्रणाही हादरल्या आहेत. या प्रकरणामुळे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मनीषा वाघमारे हिने सर्वप्रथम हा पेपर अहिल्यानगरमधील धनंजय नावाच्या व्यक्तीकडे दिला. त्यानंतर धनंजयने तो नाशिकमधील शुभमकडे पोहोचवला. पुढे शुभमने हा पेपर गुरुग्राममधील यश यादव याच्याकडे पाठवला. यानंतर यश यादवने राजस्थानमधील जयपूरजवळील जमवा रामगड परिसरातील मांगीलाल आणि दिनेश बिवाल यांच्यापर्यंत पेपर पोहोचवल्याचे उघड झाले आहे.

या साखळीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मांगीलालने हा पेपर आपल्या मुलगा विकास याला दिला. विकास सीकर येथे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने पुढे आपल्या मित्रांना हा पेपर विकून मोठ्या प्रमाणात पैसे कमावल्याचा आरोप आहे. त्यामुळे या रॅकेटमध्ये अनेक विद्यार्थी, एजंट आणि मध्यस्थ सहभागी असल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.

दरम्यान, तपासातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मनीषा वाघमारेकडे हा पेपर नेमका आला कुठून? सीबीआयला संशय आहे की, या प्रकरणात पी. व्ही. कुलकर्णी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असू शकते. तपास यंत्रणांच्या मते, कुलकर्णी यांच्याकडूनच हा पेपर मनीषापर्यंत पोहोचला असावा. या संशयाची खातरजमा करण्यासाठी आता सीबीआय दोघांची समोरासमोर चौकशी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
मनीषा वाघमारेच्या मोबाईलमधील डेटा, कॉल रेकॉर्ड आणि बँक व्यवहारांची तपासणी करताना अनेक धक्कादायक माहिती समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. आर्थिक व्यवहार, सततचे संपर्क आणि संशयास्पद हालचालींमुळे तपासाची दिशा आणखी गंभीर बनली आहे. या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, NEET सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. सीबीआयचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या घोटाळ्यामागील आणखी धक्कादायक रहस्य उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.