कोयत्यासह तिघे जेरबंद; पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गुन्हा टळला…

लोणी काळभोर : कवडीपाट टोलनाका परिसरात कोयता घेऊन संशयास्पद हालचाली करणाऱ्या तिघांना पोलिसांनी गुरुवारी (१४ मे) रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पकडले असून, त्यांच्या ताब्यातून धारदार लोखंडी कोयता आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलीस अंमलदार महेंद्र रनवरे यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रौनक संजय धांडे (वय १९), निखिल अनिल झेंडे (वय २०) आणि एक १७ वर्षीय विधीसंघर्षित बालक(तिघे रा. हडपसर परिसरातील गोसावी वस्ती) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांचे एक पथक प ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.

त्यावेळी पोलीस हवालदार अशोक नळे यांना एका खबऱ्यामार्फत हिरा अमृत बार परिसरात तीन तरुण कोयता घेऊन संशयास्पदरीत्या थांबले असून ते गंभीर गुन्ह्याच्या तयारीत आहेत. अशी माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला. पहाटे साडेचारच्या सुमारास हिरा अमृत बारजवळ प तीन तरुण स्कुटरसह उभे असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून तिघांनाही जागीच जेरबंद केले.

पोलिसांनी संशयितांच्या स्कुटरची झडती घेतली असता सीटजवळ खोचून ठेवलेला धारदार लोखंडी कोयता आढळून आला. पंचांसमक्ष तो जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या कोयत्याची धार अत्यंत तीक्ष्ण असून तो जीवघेण्या हल्ल्यासाठी वापरला जाऊ शकला असता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये होंडा अॅक्टिव्हा स्कुटर आणि लोखंडी कोयत्याचा समावेश आहे.
पहाटेच्या अंधारात कोयता घेऊन हे तरुण नेमके कोणत्या उद्देशाने फिरत होते? कोणावर हल्ल्याची तयारी होती का? परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न होता का? की एखाद्या गंभीर गुन्ह्याचा कट रचला जात होता? याबाबत आता पोलीस सखोल तपास करत आहेत.
विशेष म्हणजे, शहरात अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीकडे वाढता कल पुन्हा एकदा समोर आला आहे. पकडलेल्या तिघांपैकी एक विधीसंघर्षित बालक असल्याने पालक आणि समाजात चिंता व्यक्त केली जात आहे. तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.