पुण्यातील ‘त्या’ गुप्त बैठकीने वाढवल्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा; राजकारणात नवी खळबळ


पुणे : राज्याच्या राजकारणात शांत दिसणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा पडद्यामागील हालचालींना वेग आल्याची चर्चा रंगू लागली आहे. पुण्यात एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडलेल्या गुप्त बैठकीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना नव्याने हवा मिळाली आहे. विशेष म्हणजे या बैठकीनंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे चर्चांना आणखी जोर चढला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अनेक दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते. माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील तसेच पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी बैठकीत सहभाग घेतला. काही तास चाललेल्या या बैठकीत पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीसह दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेटही आता चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तब्बल दोन वर्षांहून अधिक कालावधीनंतर तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. माध्यमांशी बोलताना तटकरे यांनी ही भेट केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, पुण्यातील बैठकीत या भेटीवरही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलीनीकरणाबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बैठकीनंतर समोर आलेल्या चर्चांमुळे आता “दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का?” हा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

येत्या काही दिवसांत या घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता असून, राज्यातील राजकीय वातावरण तापण्याचे संकेत मिळत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!