पेट्रोल-डिझेल महागाईनंतर आता निसर्गाचा कहर; राज्यातील 17 जिल्ह्यांवर दुहेरी संकट, प्रशासनाचा मोठा इशारा

पुणे : राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी फटका पाहायला मिळत आहे. एका बाजूला कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूला अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली असून हवामानातील सततच्या बदलामुळे नागरिकांसह शेतकरीही चिंतेत आहेत.

भारतीय हवामान विभागाने आज मराठवाड्यातील काही भागांसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा 44 अंशांच्या पुढे गेल्याने उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवत आहे.
अकोला येथे राज्यातील सर्वाधिक 45.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अमरावती, अकोला, वर्धा, पालघर, रायगड, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा गंभीर इशारा देण्यात आला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून दमट वातावरणामुळे घामाच्या त्रासातही वाढ झाली आहे.

दरम्यान, नांदेड, सातारा, कोल्हापूर, सांगली, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह पावसामुळे काही भागांत घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले. सततच्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

मालेगाव परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून अनेक विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. काही ठिकाणी विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्याचे चित्र आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. मुंबई, पालघर आणि ठाणे परिसरातही उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये वादळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले असून अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हवामानातील या बदलत्या परिस्थितीमुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि उष्णघाताची लक्षणे जाणवल्यास तातडीने रुग्णालयात जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.