मोशीतील हॉटेलमध्ये आरपीआय पदाधिकाऱ्याची हत्या; जुन्या वादातून हल्ल्याचा संशय

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणारी घटना बुधवारी रात्री मोशी टोलनाका परिसरात घडली. आरपीआय कामगार आघाडीचे राज्य कार्याध्यक्ष अनिल मारुती गोळे उर्फ मोरे (वय ४६) यांची युवराज गार्डन हॉटेलमध्ये धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांनी जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

अनिल गोळे हे कुरुळी (ता. खेड) येथील रहिवासी असून, रिअल इस्टेट व्यवसायासोबत रिपब्लिकन पक्षाच्या कामगार आघाडीत सक्रिय होते. बुधवारी रात्री ते स्वतःच्या कारने बाहेर गेले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास युवराज गार्डन हॉटेलमध्ये त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती त्यांच्या चालक नागनाथ चाटे यांना मिळाली. ते तातडीने घटनास्थळी पोहोचले असता गोळे हे गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.
जखमी अवस्थेत असतानाच गोळे यांनी काही दिवसांपूर्वी नितीन धोत्रे याच्यासोबत वाद झाल्याचे चालकाला सांगितल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. त्या वादावेळी धमक्या देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले होते. तसेच, धोत्रेच्या सांगण्यावरून दोन जणांनी चाकूने हल्ला केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

गोळे यांना तातडीने मोशीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानुसार त्यांच्या पोटावर गंभीर वार करण्यात आले होते. नाक आणि डाव्या गुडघ्यावरही जखमा आढळल्या आहेत.

दरम्यान, या हत्येमागे जुगार अड्ड्यावर झालेल्या पोलिस कारवाईचा राग कारणीभूत असू शकतो, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. पुणे ग्रामीण भागात सुरू असलेल्या एका जुगार क्लबवर काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई केली होती. ही कारवाई गोळे यांच्या माहितीवरून झाल्याचा संशय व्यक्त होत असून, त्यातूनच वाद तीव्र झाल्याची शक्यता तपासात पुढे येत आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनेनंतर आरपीआय कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.