ना गाड्यांचा ताफा, ना व्हीआयपी कार! सीएम फडणवीसांची थेट बुलेटवरून विधानभवनात एंट्री; सर्वांच्या नजरा खिळल्या

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करण्याचे आवाहन केल्यानंतर देशभरात इंधन बचतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनीही आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज थेट दुचाकीवरून मंत्रालयात प्रवेश केला. आलिशान गाड्यांचा ताफा आणि व्हीआयपी एन्ट्री बाजूला ठेवत मुख्यमंत्री बाईकवरून मंत्रालयात पोहोचल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले.
मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे हे देखील दुचाकीवरून मंत्रालयात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या या अचानक एन्ट्रीमुळे प्रशासनाचीही धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल-डिझेल बचतीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला आहे. आजही ते इलेक्ट्रिक कारमधून विधानभवनात पोहोचले. त्याचबरोबर शिवसेना नेते उदय सामंत यांनी आपल्या ताफ्यात संपूर्ण इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश केला आहे. राज्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा असलेले ते पहिले मंत्री ठरले आहेत.
