गुवाहाटी दौऱ्याचा धक्कादायक ‘हॉटेल दुवा’! भोंदू खरात प्रकरणात नवा राजकीय स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट

राज्यात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता नवा आणि मोठा ट्विस्ट समोर आल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. महिलांचे लैंगिक शोषण, जादूटोणा आणि आर्थिक गैरव्यवहारांचे गंभीर आरोप असलेल्या या प्रकरणाची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे.

अशातच आता असा दावा करण्यात येत आहे की, रुपाली चाकणकर, अशोक खरात आणि प्रतिभा चाकणकर यांनी एकत्र गुवाहाटी दौरा केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 28 ते 30 ऑगस्ट 2021 दरम्यान हे तिघेही आसाममधील गुवाहाटी येथे रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये वास्तव्यास होते, असा दावा पुढे येत आहे.
या दौऱ्यात त्यांनी प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात दर्शन घेतले आणि काही धार्मिक विधी केले असावेत, अशीही चर्चा आहे. मात्र या संपूर्ण दाव्याला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. तरीही या चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात याआधीही रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडून चौकशी करण्यात आली आहे. चौकशीनंतर त्यांनी सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिल्याचा दावा करत तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे स्पष्ट केले होते.

आता गुवाहाटी दौऱ्याच्या नव्या दाव्यामुळे विरोधकांकडून चौकशीची मागणी अधिक तीव्र झाली असून, या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणा या सर्व दाव्यांची पडताळणी करत असून पुढील खुलास्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.