वैशाख वणवा जीवघेणा! पुरंदरमध्ये उन्हामुळे ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शेळ्या चारताना जागीच कोसळले


पुणे : राज्यभर उष्णतेची तीव्र लाट सुरू असताना पुणे जिल्ह्यात उष्माघातामुळे आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुरंदर तालुक्यातील जेऊर परिसरात तीव्र उन्हाचा फटका बसून ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून वाढत्या तापमानामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत व्यक्तीचे नाव बाबुराव दुष्यंत जाधव (वय ६२) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव जाधव हे नेहमीप्रमाणे शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी जेऊर-मांडकी कॅनॉललगतच्या शेत परिसरात गेले होते. सकाळी अकराच्या सुमारास परिसरातील तापमान झपाट्याने वाढले आणि उकाडा असह्य झाला. त्याचवेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि काही वेळातच ते जागीच कोसळले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासणीत उष्माघाताची लक्षणे आढळल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, राज्यात सध्या उष्णतेचा कहर वाढत असून अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. दुपारच्या वेळेत नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत असून शेतकरी, मजूर आणि जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!