मुंबई-पुणे प्रवास झाला सुपरफास्ट! मिसिंग लिंकमुळे ई-शिवनेरीचा वेळ तब्बल ४० मिनिटांनी कमी…


पुणे : पुणे आणि मुंबईदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील नव्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीत मोठी घट झाली असून ई-शिवनेरी बससेवा आता अधिक वेगवान आणि वेळेवर धावू लागली आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर झाला असून एसटी प्रशासनालाही मोठा फायदा होत आहे.

यापूर्वी घाट परिसरात विशेषतः विकेंडदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे. त्यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील बससेवा अनेकदा अर्धा ते पाऊण तास उशिरा पोहोचत होती. या उशिराचा थेट परिणाम इलेक्ट्रिक बसांच्या चार्जिंगवर होत होता. चार्जिंगसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने काही वेळा एसटीला फेऱ्या रद्द करण्याची वेळ येत होती.

मात्र, १ मेपासून सुरू करण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ मार्गामुळे परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. लोणावळा घाटातील कोंडी टाळून थेट पुढे जाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. एका बाजूच्या प्रवासात जवळपास २० मिनिटांची बचत होत असून जाण्या-येण्याचे मिळून तब्बल ४० मिनिटे वाचत आहेत.

या नव्या बदलाचा फायदा दादर, बोरिवली आणि ठाणे मार्गावरील ई-शिवनेरी बससेवेलाही झाला आहे. सध्या स्वारगेट बसस्थानकातून दररोज १८४ ई-शिवनेरी फेऱ्या आणि १२ साध्या शिवनेरी फेऱ्या सुरू आहेत. नव्या मार्गामुळे आता बहुतांश बस वेळेवर पोहोचत असून प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी वाहतूक कोंडीमुळे होणारा उशीर आता जवळपास थांबला आहे. वेळेची बचत होत असल्याने इलेक्ट्रिक बसांना चार्जिंगसाठी पुरेसा वेळ मिळत आहे आणि एकही फेरी रद्द करण्याची वेळ येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!