महाराष्ट्रात तापमानाचा स्फोट; पुढील ३ दिवस नागरिकांसाठी धोक्याचे, हवामान विभागाचं विशेष काळजीचं आवाहन


पुणे : राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विदर्भात उष्णतेची तीव्रता अधिक वाढली असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमान मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अनेक जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. अकोला आणि नंदुरबार येथे तापमानाने ४५.३ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून राज्यातील बहुतांश भागात पारा ४० अंशांच्या पुढे पोहोचला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे तापमानात घट होण्याची चिन्हे सध्या दिसत नाहीत. उलट विदर्भात येत्या चार ते पाच दिवसांत तापमान आणखी वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर विदर्भातील काही भागांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने संपूर्ण विदर्भासाठी उष्णतेचा इशारा दिला असून मे महिन्याच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा तीव्र उष्णतेची लाट धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव कमी होत असल्याने उत्तरेकडून गरम वारे वाहत आहेत. त्याचा थेट परिणाम विदर्भातील तापमानावर होत असून पुढील काही दिवसांत तापमानात तब्बल ४ ते ६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांमध्ये तापमान ४५ ते ४६ अंशांच्या पुढे जाण्याची दाट शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!