पतीसोबत भांडण झालं अन् मध्यरात्री ट्रेनमधून उतरली; ६ दिवसांनी बिहारमध्ये सापडलेल्या महिलेची कहाणी धक्कादायक


कानपूर : केदारनाथ यात्रेहून परतताना ट्रेनमध्ये पतीसोबत झालेलं भांडण एका महिलेला थेट बिहारपर्यंत घेऊन जाईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. मध्यरात्री अचानक ट्रेनमधून गायब झालेल्या प्रज्ञा सिंह यांच्या बेपत्ता होण्याने पोलिसांसह कुटुंबीयांची झोप उडाली होती. अपहरण, अपघात की काही अनर्थ? अशा अनेक शक्यतांमध्ये तपास सुरू असतानाच तब्बल ६ दिवसांनी प्रज्ञा बिहारमधील बेगूसराय येथे सुरक्षित सापडली आणि त्यानंतर समोर आलेलं सत्य धक्कादायक ठरलं.

५ मेच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती. सुरुवातीला प्रज्ञाचे अपहरण झाले की अपघात, याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. मात्र तपासानंतर समोर आलेली माहिती पूर्णपणे वेगळीच निघाली.

लक्सरचे एसपी (ग्रामीण) शेखर चंद्र सुयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथ दर्शन करून प्रज्ञा आणि तिचा पती मनीष नंदा देवी एक्सप्रेसने गाझियाबादकडे परतत होते. प्रवासादरम्यान दोघांमध्ये एका कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की रागाच्या भरात प्रज्ञाने पतीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.

प्रज्ञाने पोलिसांना सांगितले की, मनीष झोपल्यानंतर ती गुपचूप ट्रेनमधून उतरली. मात्र रागाच्या भरात ती कोणत्या स्टेशनवर उतरली आहे किंवा पुढे कुठे जात आहे, याचं भानही तिला राहिलं नाही. त्यानंतर ती स्टेशनवर उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रेनमध्ये तिकीट नसतानाच चढली. ही ट्रेन थेट बिहारकडे जात असल्याची कल्पनाही तिला नव्हती.

दरम्यान, मुझफ्फरनगरजवळ मनीषला जाग आल्यानंतर प्रज्ञा सीटवर नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने संपूर्ण डबा आणि वॉशरूममध्ये तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. तिचा मोबाईलही बंद लागत असल्याने त्याने तातडीने रुरकी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

तपासादरम्यान पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रुरकी आणि मुझफ्फरनगर स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने तपासात मोठा अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी रेल्वे ट्रॅकवर अनेक किलोमीटरपर्यंत शोधमोहीमही राबवली.

अखेर बेगूसरायला पोहोचल्यानंतर प्रज्ञाला परिस्थितीची जाणीव झाली आणि तिने आईला फोन करून आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तिचं लोकेशन ट्रेस करत तिला शोधून काढलं. सध्या प्रज्ञा कानपूरमधील आपल्या घरी असून पोलिसांनी तिला कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!