पेट्रोल डिझेल सोनं; नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर शरद पवार यांनी सुचवला उपाय, म्हणाले….

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेक बाबतीत काटकसर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे असताना शरद पवार यांनी एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले, मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या.

त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे.

सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा.

पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे. असेही शरद पवार म्हणाले.