इंस्टाग्रामवरील प्रेमासाठी सीमा ओलांडली! बांगलादेशी तरुणी जळगावात अटकेत; प्रियकरासह धक्कादायक खुलासे उघड


जळगाव : सोशल मीडियावरील प्रेम किती धोकादायक वळण घेऊ शकतं याचं थरारक उदाहरण जळगावमध्ये समोर आलं आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून प्रेमात पडलेली 20 वर्षीय बांगलादेशी तरुणी कोणीका राणी शामलचंद्र राय हिने कोणतीही अधिकृत परवानगी, पासपोर्ट किंवा व्हिसा नसताना चक्क बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करून जळगाव गाठलं आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

शनिपेठ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर शहरातील भोई गल्ली, जोशी पेठ परिसरात छापा टाकण्यात आला. या कारवाईत संशयितरित्या वास्तव्यास असलेली कोणीका राणी आढळून आली. चौकशीत तिच्याकडे कोणतेही वैध प्रवास कागदपत्र नसल्याचं स्पष्ट झालं. ती जळगावमधील सोन्याचे कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला याच्यासोबत राहत असल्याची माहितीही समोर आली.

प्राथमिक तपासात धक्कादायक बाब उघड झाली आहे. इन्स्टाग्रामवरील ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्याच प्रेमासाठी कोणीका हिने बांगलादेशची सीमा ओलांडून भारतात प्रवेश केल्याचा पोलिसांचा संशय आहे. दोघांनीही “आम्ही विवाह केला आहे” असा दावा केला, मात्र विवाहाचे कोणतेही अधिकृत पुरावे किंवा नोंदी पोलिसांना सापडलेल्या नाहीत.

या प्रकरणात शनिपेठ पोलिसांनी कोणीका राणीला अटक केली असून तिच्या वास्तव्यास मदत केल्याप्रकरणी चिन्मय वाला याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमिग्रेशन कायदा आणि परदेशी नागरिक कायदा 2025 अंतर्गत गंभीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पोलिस आता हे तपासत आहेत की कोणीका भारतात नेमकी कोणत्या मार्गाने आली, सीमापार प्रवासात तिला कोणाची मदत मिळाली का, तसेच या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का. या घटनेमुळे सोशल मीडियावरील नात्यांच्या सुरक्षिततेवर आणि कायदेशीर मर्यादांवर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!