सोनं खरेदी न करण्याचे मोदींचे आवाहन नेमकं कशासाठी? आता खरी माहिती आली समोर, जाणून घ्या आर्थिक गणित…

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारतीयांना काही आवाहनं केली आहेत. गोष्टी जबाबदारीने वापरण्यास मोदी यांनी जनतेला सांगितलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पंतप्रधान मोदींनी लोकांना पुढील वर्षभर अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. यामुळे त्यांनी असे का सांगितले असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावश्यक खर्च कमी करण्याचा आणि गरज भासल्यास घरून काम करण्याचा सल्लाही दिला आहे. परकीय चलन साठ्यावरील दबाव कमी करण्यासाठी आणि आयातीवरील खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार सर्व भारतीयांना हा संदेश दिला आहे. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
भारतातील लोकांकडे 34,600 टन सोनं आहे. हा आकडा जगातील सर्व मध्यवर्ती बँकांच्या एकत्रित सोन्याच्या साठ्यापेक्षा देखील जास्त आहे. भारत जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या उपभोक्त्यांपैकी एक आहे. आपल्या कुटुंबांमध्ये सोन्याला केवळ एक दागिना न मानता, एक गुंतवणूक आणि सामाजिक प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं.

तसेच लग्न, सण आणि पारंपरिक प्रसंगांसाठी सोनं खरेदी करणं हे आपल्या देशाच्या संस्कृतीचा एक भाग आहे. यामुळे आपल्या देशात सोनं महाग झालं तरी खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर तरी यामध्ये काही फरक पडणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करतो. ग्रामीण भागातही, मोठ्या संख्येने कुटुंब सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. यामुळे खरेदीदारांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.