कर्जमाफीचा निर्णय या महिना अखेरीलाच? शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची माहिती आली समोर….

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून लवकरच कर्जमाफीचा मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, मे महिन्याअखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम निर्णय होऊ शकतो. सहकार विभागाने पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे सादर केली असून, सुमारे ३४ ते ३५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध बँकांकडून शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मागविण्यात आली होती. यामध्ये कर्जाची स्थिती, जमीन नोंदी, आधार क्रमांक, बँक खाते तपशील, पीककर्जाचा प्रकार यांसह तब्बल ५४ मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीतील थकीत
तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा डेटा शासनाकडे जमा करण्यात आला आहे. राज्य सरकारने यापूर्वी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा प्रस्ताव तयार केला आहे. याशिवाय नियमित

कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचाही विचार सुरू आहे. प्रविणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याबाबतचा अहवाल शासनाला सादर केला असून, त्यानंतर निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे.

सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बँकांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. जूनअखेरपर्यंत या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता असून, राज्यातील लाखो शेतकरी आता शासनाच्या अधिकृत निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत.