पुणे जिल्ह्यातील मोठ्या साखर कारखान्यात कोट्यावधीचा घोटाळा, कारखानदारी क्षेत्रात खळबळ, चौकशीचे आदेश…

पुणे : पुणे जिल्ह्यात अनेक साखर कारखाने असून आता जिल्ह्यातील कडबनवाडी येथील हरणेश्वर साखर कारखाना आर्थिकव्यवहारांतील कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी राज्य शासनाने सात सदस्यीय समिती नेमली आहे. या कारखान्याची चौकशी होणार असून या निर्णयामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

यामध्ये सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार पुण्याचे साखर आयुक्त या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. याबाबत या प्रकरणातील सर्व आर्थिक व्यवहार आणि लिलाव प्रक्रियेची सखोल चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येतील.
तसेच या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे. समितीला तातडीने चौकशी करून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत भाजप नेते आणि तक्रारदार माउली चवरे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

शेतकऱ्यांच्या मालकीचा आजच्या घडीला सुमारे ३०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेला कारखाना अवघ्या १३ कोटी रुपयांत विकण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत गेल्या वर्षी मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर अखेर सहकार विभागाने चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, व्यवस्थापन आणि गुंतवणूकदारांकडून वन टाइम सेटलमेंटसाठी ८२ कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असताना हा प्रस्ताव फेटाळून केवळ १३ कोटी रुपयांत लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा आरोप होत आहे.