उरुळी देवाची, फुरसुंगी नगरपरिषदेबाबत सोमवारी महत्वाची सुनावणी…!

पुणे : पुण्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे सन २०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर येथे महापालिकेने आकारलेला कर जास्त असल्याने आणि कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा दावा करण्यात आला.

यामुळे या गावांनी महापालिकेतून वगळण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ६ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत केली.
फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे पालिकेतून वगळून या दोन गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या अधिसूचनेवर तब्बल साडेसहा हजार हरकती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झाल्या आहेत.
या हरकतींवर सोमवारपासून सुनावणी सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी फुरसुंगी, उरुळी देवाची ही गावे वगळण्याचे जाहीर केले.

त्यानुसार महापालिका प्रशासनाने प्रक्रिया सुरू करून शासनाकडे अहवाल पाठविला होता. नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी याबाबतची प्रारूप अधिसूचना चालू वर्षी ३१ मार्च रोजी प्रसृत केली.

त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांनी हरकती नोंदविल्या आहेत. महिनाभरात जिल्हा प्रशासनाकडे साडेसहा हजारांहून अधिक हरकती-सूचना प्राप्त झाल्या आहेत. आलेल्या अर्जांची छाननी करून त्या नोंदविण्याचे काम सुरू आहे.