खेड शिवापूर टोलनाक्यावर मृत्यूचा थरार! गॅस टँकरखाली दाम्पत्य चिरडलं; संतप्त नागरिकांचा राडा

पुणे : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला आणि काही क्षणांतच आनंदाचा प्रवास कायमचा थांबला. खेड शिवापूर टोलनाक्याजवळ भरधाव गॅस टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दोघेही टँकरखाली ओढले गेले. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी टँकरची तोडफोड करत परिसरात तणाव निर्माण केला.

मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथील राजेंद्र बबन मोरे (वय ५५) आणि सविता राजेंद्र मोरे (वय ४२) हे दुचाकीवरून साताऱ्याकडे निघाले होते. खेड शिवापूर टोल नाक्याच्या मागील सातारा लेनवर भरधाव गॅस टँकर क्रमांक एपी 03 टीई 5759 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी दूरपर्यंत फेकली गेली, तर दाम्पत्य टँकरखाली सापडल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर महामार्गावर एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र दोघांचाही मृत्यू झाल्याचं स्पष्ट होताच संतापाचा उद्रेक झाला. काही नागरिकांनी गॅस टँकरची तोडफोड केली. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून टँकर चालक राज किशन बी. याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, धुळे जिल्ह्यातील दहिवेल शिवारातही आणखी एक टँकर अपघात घडला. मनमाडहून १२ हजार लिटर पेट्रोल-डिझेल घेऊन जाणारा टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या झाडावर आदळला. धडकेमुळे टँकरच्या टाकीला भगदाड पडून हजारो लिटर इंधन रस्त्यावर वाहू लागलं. इंधन गळतीची माहिती मिळताच स्थानिकांनी बाटल्या आणि कॅन घेऊन घटनास्थळी गर्दी केली. परिस्थिती गंभीर होताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेत मोठी दुर्घटना टाळली. मात्र हजारो लिटर इंधन वाया गेल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
