गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांनी तातडीने तपासा ‘हे’ नियम; नाहीतर कनेक्शन बंद होऊ शकतं..


पुणे : एलपीजी गॅस सिलिंडर आणि पीएनजी कनेक्शन वापरणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘एक घर, एक कनेक्शन’ धोरणाची आता कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, एका घरात एकाच वेळी अनुदानित एलपीजी सिलिंडर आणि पीएनजी कनेक्शन ठेवण्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या गॅस कनेक्शनची माहिती तातडीने तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन नियमांनुसार, एका घरात एलपीजी गॅस सिलिंडर किंवा पीएनजी कनेक्शन यापैकी एकच सुविधा वापरता येणार आहे. दोन्ही सुविधा एकाच वेळी वापरणाऱ्या ग्राहकांवर कारवाई होऊ शकते, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर ताण निर्माण होत असल्याने एलपीजीचा पुरवठा गरजू ग्राहकांना प्राधान्याने मिळावा, यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

सरकारच्या निर्णयानंतर देशातील तेल कंपन्या आणि गॅस वितरकांनी तपास मोहीम सुरू केली आहे. विशेषतः दिल्लीसह अनेक शहरांमध्ये एलपीजी आणि पीएनजी दोन्ही सुविधा वापरणाऱ्या घरांची पडताळणी केली जात आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या नव्या आदेशानुसार, पीएनजी सुविधा उपलब्ध असलेल्या घरांना नवीन एलपीजी कनेक्शन देऊ नये तसेच सिलिंडर रिफिल रोखण्याच्या सूचना तेल कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

अनुदानित एलपीजी सिलिंडरचा गैरवापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने हे धोरण लागू केले आहे. विशेषतः ज्या भागांमध्ये अजून पीएनजी सुविधा पोहोचलेली नाही, त्या ठिकाणच्या कुटुंबांना पुरेसा एलपीजी पुरवठा मिळावा हा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

ज्या ग्राहकांकडे एलपीजी आणि पीएनजी दोन्ही कनेक्शन आहेत, त्यांना एलपीजी जोडणी जमा करावी लागू शकते. सरकारच्या माहितीनुसार, हजारो ग्राहकांनी स्वेच्छेने एलपीजी कनेक्शन परत केले असून, तपास मोहीम आणखी वेगाने सुरू आहे.

दरम्यान, नव्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधितांचे गॅस कनेक्शन बंद करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या गॅस कनेक्शनची माहिती तपासून आवश्यक ती प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!