15 व्या वर्षी जग जिंकलं… आता 21 व्या वर्षीच निवृत्ती? वैभवबाबत दिग्गजांचं धक्कादायक विधान!

अवघ्या 15 व्या वर्षी आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत संपूर्ण क्रिकेटविश्वाला वेड लावणारा राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी आता जागतिक क्रिकेटमधील चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्याच्या आक्रमक खेळीमुळे अनेक दिग्गज क्रिकेटपटू प्रभावित झाले असून, आता इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन आणि आलिस्टेअर कूक यांनीही वैभवचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी एक धक्कादायक शक्यताही व्यक्त केली आहे. वैभव कदाचित वयाच्या 21 व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, अशी मिश्किल पण चर्चेत आलेली टिप्पणी त्यांनी केली.

‘स्टिक टू क्रिकेट’ या लोकप्रिय पॉडकास्टमध्ये बोलताना मायकल वॉन म्हणाला, “हा मुलगा आधीच 35-36 चेंडूंमध्ये शतकं ठोकतोय. तो आता ख्रिस गेलच्या विक्रमाच्या दिशेनं वाटचाल करतोय.” ख्रिस गेलने आयपीएलमध्ये 30 चेंडूंमध्ये शतक झळकावत विक्रम केला होता. वैभवची सध्याची खेळी पाहता तो हा विक्रम मोडू शकतो, असा सूर वॉनच्या वक्तव्यातून दिसून आला.
वैभवने एप्रिल 2025 मध्ये केवळ 14 वर्षे 23 दिवस वय असताना आयपीएल पदार्पण केलं होतं. त्यानंतर अवघ्या दोन हंगामांत त्याने क्रिकेटविश्व हादरवून सोडलं. 2025 आणि 2026 या दोन हंगामांतील फक्त 17 सामन्यांमध्ये त्याने 656 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 38.59 तर स्ट्राईक रेट तब्बल 224.66 इतका आहे. या काळात त्याने दोन शतकं आणि तीन अर्धशतकं झळकावली आहेत.

2025 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध वैभवने 38 चेंडूंमध्ये 101 धावांची खेळी करत इतिहास रचला होता. विशेष म्हणजे त्याचं शतक फक्त 35 चेंडूंमध्ये पूर्ण झालं होतं, जे आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात वेगवान शतक ठरलं. त्यानंतर 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने 37 चेंडूंमध्ये 103 धावांची आणखी एक तुफानी खेळी केली.

वॉनने वैभवच्या षटकार मारण्याच्या क्षमतेचंही खास कौतुक केलं. “आयपीएलमध्ये भारतीय फलंदाजांमध्ये एका हंगामात सर्वाधिक 42 षटकारांचा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर आहे. वैभव आधीच 37 षटकारांवर पोहोचला आहे. सध्याच्या घडीला तो जगातील सर्वोत्तम षटकार मारणारा युवा फलंदाज आहे,” असं वॉन म्हणाला.
दरम्यान, पॉडकास्टदरम्यान गंमतीत चर्चा करताना एका सदस्याने “तो असाच खेळत राहिला तर 21 व्या वर्षीच थकून जाईल,” अशी टिप्पणी केली. त्यावर वॉनने हसत उत्तर दिलं, “तेव्हा त्याच्याकडे इतके पैसे असतील की तो निवृत्तही होईल.” त्यावर आलिस्टेअर कूकने “तो थकेल कसा? तो फक्त 30 चेंडू खेळतो,” असं म्हणत वातावरणात हास्याची लाट निर्माण केली.
आयपीएलपुरतंच नव्हे, तर वैभवने भारताच्या 19 वर्षांखालील विश्वचषक मोहिमेतही चमकदार कामगिरी केली होती. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने 80 चेंडूंमध्ये 175 धावांची विक्रमी खेळी करत ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार पटकावला होता.