तामिळनाडू राजकारणात मोठा ट्विस्ट; विजय थलपतींच्या मुख्यमंत्रीपदाला राज्यपालांचा ब्रेक

तामिळनाडू : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवणाऱ्या टीव्हीके पक्षाला सत्तास्थापनेच्या टप्प्यावर मोठा धक्का बसला आहे. पक्षप्रमुख विजय थलपती यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा सादर केला होता आणि लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची तयारी सुरू केली होती. मात्र राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी 118 आमदारांचा स्पष्ट पाठिंबा असलेले पत्र सादर करण्याची अट घातल्याने प्रक्रिया थांबली आहे.

टीव्हीके पक्षाने निवडणुकीत 108 जागा जिंकल्या असून काँग्रेसच्या 5 आमदारांच्या पाठिंब्यामुळे संख्याबळ 113 पर्यंत पोहोचते. मात्र बहुमतासाठी 118 जागांची गरज असल्याने पक्षाला अजून 5 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. काही राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार विजय थलपती दोन मतदारसंघांतून विजयी झाल्याने प्रत्यक्ष संख्याबळ 107 मानले जात असल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.
या निर्णयामुळे टीव्हीके पक्षात नाराजी पसरली असून शपथविधीसाठी नेहरु स्टेडियममध्ये सुरू असलेली तयारी थांबवण्यात आली आहे. समर्थकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अण्णाद्रमुकमध्येही मोठी राजकीय हालचाल सुरू झाली आहे. पक्षातील 47 पैकी 28 आमदारांना पुद्दुचेरीतील रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले असून काही आमदार टीव्हीकेला पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सध्या तामिळनाडू विधानसभेतील बलाबल असे आहे – टीव्हीके 108, द्रमुक 59, अण्णाद्रमुक 47, काँग्रेस 5 आणि इतर 8 (एकूण 234). कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. पुढील काही दिवस राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.