अजित पवारांच्या परंपरेला जय पवारांची नवी जोड; बारामतीत पहिला जनता दरबार!


बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्षानुवर्षे जपलेली जनतेशी थेट संवाद साधण्याची परंपरा आता युवा नेते जय पवार यांच्या माध्यमातून नव्या उर्जेसह पुढे जात असल्याचे चित्र बारामतीत पाहायला मिळत आहे.

बारामतीच्या राजकारणात विकास, जनसंपर्क आणि लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते ही अजित पवार यांच्या कार्यशैलीची ओळख मानली जात होती. सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी त्यांनी कायम पुढाकार घेतला. प्रत्येक नागरिकाला “आपला नेता आपल्या पाठीशी आहे” हा विश्वास देणारी त्यांची लोकाभिमुख कार्यपद्धती बारामतीच्या राजकारणात विशेष ठरली.

हीच परंपरा आता जय पवार पुढे नेत असल्याचे दिसून येत आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी तालुक्यातील गावागावांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला होता. शेतकरी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या त्यांनी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. प्रचारापुरते मर्यादित न राहता लोकांमध्ये मिसळून त्यांच्या अडचणी ऐकून घेण्याच्या त्यांच्या शैलीची बारामतीत मोठी चर्चा झाली होती.

याच दरम्यान त्यांनी दर गुरुवारी जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच त्यांनी दिलेला शब्द पाळत पहिल्याच गुरुवारी जनता दरबार आयोजित करून जनतेप्रती असलेली बांधिलकी दाखवून दिली. आज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सहयोग निवासस्थानी हा जनता दरबार पार पडणार असून नागरिकांच्या विविध प्रश्नांवर थेट संवाद साधला जाणार आहे. तालुक्यातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या बारामतीच्या राजकारणात जय पवार अधिक सक्रिय झाल्याचे दिसत असून लोकांमध्ये मिसळून काम करण्याची त्यांची शैली, प्रत्येक प्रश्न गांभीर्याने ऐकून घेण्याची भूमिका आणि अजित पवार यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचा प्रभाव यामुळे भविष्यात बारामतीचे नेतृत्व जय पवार यांनी करावे अशी भावना अनेक बारामतीकरांकडून व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!