सोन्या-चांदीत उसळी! जागतिक घडामोडींचा परिणाम; वाचा आजचे लेटेस्ट दर

नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. बुधवारी ६ मे रोजी मौल्यवान धातूंच्या किमतीत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली.
आदल्या सत्रात सोन्याचे भाव एका महिन्याच्या नीचांकी स्तरावर पोहोचल्यानंतर, स्वस्त दरांचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली. मध्य-पूर्वेतील तणाव आणि डॉलरच्या मूल्यातील घसरण यांमुळे सोने आणि चांदी पुन्हा एकदा झळाळून उठले आहेत.

बुधवारी सकाळी भारतीय वायदा बाजारात म्हणजेच एमसीएक्स वर सोने आणि चांदीच्या दरांनी मोठी झेप घेतली. कमकुवत झालेला अमेरिकन डॉलर आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण यामुळे स्पॉट मागणीत प्रचंड वाढ झाली.

सोन्याचे जून महिन्याचे फ्युचर्स १.३४ टक्क्यांनी म्हणजेच जवळपास २००० रुपयांनी वधारून १,५१,७९५ रुपयांवर पोहोचले. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला मिळणारी पसंती या दरवाढीमागे मुख्य कारण मानली जात आहे.
केवळ सोनेच नाही, तर चांदीच्या किमतीतही मोठी सुधारणा पाहायला मिळाली. चांदीचा जुलै वायदा २.४७ टक्क्यांनी म्हणजेच ६,०३४ रुपयांनी वधारून २,५०,४८० रुपये प्रति किलो झाला आहे.
सलग दुसऱ्या दिवशी डॉलर निर्देशांकात झालेली ०.२० टक्क्यांची घसरण परदेशी चलनातील गुंतवणूकदारांसाठी सोने खरेदी स्वस्त करणारी ठरली. परिणामी, बाजारात अचानक खरेदीचा जोर वाढला आणि मौल्यवान धातूंनी दिवसाच्या सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली.
मध्य-पूर्वेतील राजकीय परिस्थिती सध्या अत्यंत नाजूक आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वादांमुळे होर्मुझ सामुद्रधुनी हा महत्त्वाचा जलमार्ग २८ फेब्रुवारीपासून जवळपास ठप्प झाला आहे. तेल, खते आणि जीवनावश्यक वस्तूंच्या जागतिक वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत कळीचा असून, येथील संघर्षामुळे जागतिक महागाईचा धोका निर्माण झाला आहे. वॉशिंग्टन कडून शांततेचे दावे केले जात असले तरी, जमिनीवरील तणाव अद्याप पूर्णपणे निवळलेला नाही.