बारामतीत सुनेत्रा पवार यांची मोठी प्रतिक्रिया! अजितदादांच्या स्मृतींना समर्पित विजय, “ही फक्त सुरुवात आहे…” म्हणत भावनिक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले


बारामती: बारामतीची माती आज जरा जड झाल्यासारखी वाटते… कारण ज्या अजितदादांनी या भूमीला विकासाची नवी ओळख दिली, त्यांच्या अनुपस्थितीत झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आता हळूहळू समोर येत आहे. 23 एप्रिल रोजी झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू असून नवव्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी तब्बल 78,528 मतांची मोठी आघाडी घेतली आहे. या आघाडीमुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत सुनेत्रा पवारांची आघाडी वाढत गेली आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालं. मात्र या आनंदातही एक प्रकारची शांतता आणि भावुकता पाहायला मिळत आहे.

सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, “बारामतीकरांनी दाखवलेला विश्वास मी अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. दादांच्या आठवणींमुळे आज आपण सर्व भावूक आहोत. कृपया कुणीही जल्लोष, मिरवणूक किंवा गुलाल उधळू नये. संयम राखून दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करावं.” त्यांनी सर्व बारामतीकरांचे आभार मानत “हा शेवट नाही, ही फक्त नव्या बारामतीची सुरुवात आहे” असंही सांगितलं.

दरम्यान, बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात 22 उमेदवार रिंगणात होते. एक्झिट पोल्सनुसार त्यांचा विजय दोन लाखांहून अधिक मताधिक्याने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, अजित पवारांनी 2019 मध्ये 1,65,265 मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला होता. तोच विक्रम मोडण्यासाठी आता 1,65,266 हा जादुई आकडा चर्चेत आहे.

दुसरीकडे, राहुरी पोटनिवडणुकीच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागले असून तेथेही मतमोजणी प्रक्रियेत चुरस दिसून येत आहे. दोन्ही ठिकाणच्या निकालांमुळे राज्याच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बारामतीत आज विजयाचा रंग असला तरी वातावरण मात्र भावनिक आहे… कारण हा विजय एका व्यक्तीचा नसून अजितदादांच्या आठवणींना दिलेला जनतेचा आदर असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!