येरवडा कारागृहातून ६ वर्षापूर्वी पसार झालेल्या सराईत गुन्हेगार जेरबंद! उरुळीकांचन येथे उद्योजकाला खंडणीसाठी केले होते अपहरण! पुणे ग्रामीण एटीएस पथकाची कारवाई…


उरुळीकांचन : उरुळीकांचन येथील एका उद्योजकाला खंडणीसाठी अपहरण तसेच एका खूनाच्या प्रकरणात गुन्हा दाखल असल्याने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का अंतर्गत सन २०२० मध्ये कारवाई होऊन येरवडा कारागृहात जेरबंद असून कारागृहाच्या खिडकीच्या गज कापून गेली ६ वर्षे फरार असलेल्या कुख्यात व सराईत गुन्हेगार अजिंक्य कांबळे याला पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने अखेर जेरबंद केले आहे.

२३ डिसेंबर २०१९ रोजी उरुळीकांचन येथील प्लॉटींग व्यावसायिक विशाल खेडेकर यांना २० लाखांच्या खंडणीसाठी कुख्यात गुन्हेगार असलेल्या अजिंक्य उत्तम कांबळे (३१ वर्षे रा.टिळेकरवाडी ता.हवेली जि.पुणे ) याने अपहरण करुन खंडणी माघण्याचा प्रयत्न केला होता. या खंडणीच्या गुन्ह्यासह उरुळी कांचन येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खूनाचा गुन्हा दाखल असल्याने लोणीकाळभोर पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत अजिंक्य कांबळेवर कारवाई केली होती. त्यानुसार तो येरवडा कारागृहात जेरबंद होता.

अजिंक्य कांबळे हा येरवडा पुणे जेलमध्ये असताना जुन २०२० मध्ये त्याच्यासोबत येरवडा जेलमधून अन्य गुन्ह्यात असलेल्या एकूण ५ आरोपींसह हे सर्व जण वेळी खिडकीचे गज काढून पसार झाले होते.तेंव्हापासून गेली ६ वर्षे अजिंक्य कांबळे हा फरार होता. गेली ६ वर्षापासून पुणे ग्रामीण पोलिसांची विविध पथके त्याच्या मार्गावर होती. परप्रांतात तसेच राज्यात विविध ठिकाणी तो राहून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर ६ वर्षानंतर अजिंक्य कांबळे हा शनिवार (दि.२) मे रोजी टिळेकरवाडी येथे येणार असल्याची खबर मिळताच पुणे ग्रामीणच्या एटीएस पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याला जेरबंद केले आहे.

अजिंक्य कांबळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी लोणीकाळभोर, उरुळीकांचन व यवत पोलीस स्टेशनला खुन तसेच खंडणी, गंभीर दुखापत, मोक्का, आर्म ॲक्ट व चोरी असे एकूण ८ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान अजिंक्य कांबळे हा टिळेकरवाडी येथे वेशांतर करुन आल्याची माहिती मिळताच पुणे ग्रामीण एटीएस पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड व पोलीस हवालदार निलेश कदम यांना मिळताच त्यांनी वेशांतर करुन त्याला ताब्यात घेतले आहे. सदर कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल व बारामती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, पोलीस हवालदार निलेश कदम, सुनिल कोळी, पोलीस कॉन्स्टेबल मोसीन शेख, ओंकार शिंदे यांचे पथकाने केलेली आहे. या आरोपीच्या अटकेसाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांनी त्याचा शोध घेणेसाठी विशेष लक्ष केंद्रीय करुन एटीएस पथकाची नियुक्ती केली होती.

आरोपीला मदत करणाऱ्यांची शोधमोहीम?

सराईत गुन्हेगार हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याने त्याला या गुन्ह्यात पसार होण्यासाठी तसेच आश्रय मिळावा म्हणून प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गेली ६ वर्षापासून तो फरार होऊन पोलिसांचा गुंगारा देत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पोलिसांनी आता या आरोपीला मदत व आश्रय देणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!