चिमुरडीवर बलात्कार करून हत्या, नवले पूलावर पोलिसांकडून लाठीचार्ज? नेमकं काय घडलं…

पुणे: भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेली एक थरकाप उडवणारी घटना अजूनही लोकांच्या मनातून जात नाहीये. अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाली, आणि गावकऱ्यांच्या संतापाचा बांध फुटला. 1 मेची ती काळी रात्र… आणि त्यानंतर सुरू झालेला न्यायासाठीचा लढा!

शनिवारी रात्री गावकरी थेट पुण्याच्या नवले पुलावर मृतदेह घेऊन बसले. “आमच्या लेकराला न्याय द्या!” अशी हाक देत तब्बल चार तास रस्ता रोखून धरला. पुणे-बंगळुरु महामार्ग ठप्प! वाहनांच्या रांगा, लोकांचा आक्रोश, आणि वाढत चाललेला तणाव… वातावरण अक्षरशः स्फोटक झालं होतं.
पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांचा रोष कमी व्हायला तयार नव्हता. अखेर बळाचा वापर करून आंदोलकांना हटवलं गेलं. मात्र, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्ज नाकारत वेगळीच बाजू मांडली. “आम्ही फक्त समजावलं,” असा दावा त्यांनी केला. पण प्रत्यक्षात काय घडलं? हा प्रश्न अजूनही हवेतच आहे.

दरम्यान, आरोपीला अटक करून कोर्टाने 7 मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पण गावकऱ्यांची एकच मागणी—“त्या नराधमाला फाशीच झाली पाहिजे!”

रात्री उशिरा चिमुरडीवर अंत्यसंस्कार झाले, पण तिच्या आठवणीने गाव अजूनही रडतंय. न्याय मिळणार का? की हा आवाजही दाबला जाणार? हे सारे प्रश्न अजूनही तसेच आहेत.