“राजेश खन्नांमुळे माझे वडील बरबाद झाले” – अनिल कपूरचा धक्कादायक खुलासा!

मुंबई : बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या यश-अयशाच्या प्रवासाबाबत आजही अनेक किस्से चर्चेत असतात. ‘आराधना’, ‘आनंद’, ‘कटी पतंग’, ‘अमर प्रेम’, ‘हाथी मेरे साथी’, ‘दो रास्ते’, ‘नमक हराम’, ‘आप की कसम’ अशा हिट चित्रपटांमुळे त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. मात्र त्याच स्टारडमच्या सावलीत त्यांना काही मोठ्या फ्लॉप्सचाही सामना करावा लागला, ज्याचा परिणाम अनेकांच्या आयुष्यावर झाला.

अशाच पार्श्वभूमीवर अभिनेता अनिल कपूर यांनी लिली सिंगला दिलेल्या मुलाखतीत एक मोठा आणि भावनिक खुलासा केला आहे. त्यांनी थेट म्हटलं की, “राजेश खन्नांमुळे माझे वडील बरबाद झाले.” या वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.
अनिल कपूर यांनी सांगितलं की, त्यांच्या वडिलांनी निर्मिती केलेल्या एका चित्रपटात राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते. त्या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या आणि तो सुपरहिट होईल असा विश्वास सर्वांना होता. पण प्रत्यक्षात तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला आणि त्याचा फटका त्यांच्या कुटुंबाला बसला.

ते पुढे म्हणाले की, या अपयशानंतर त्यांच्या वडिलांना इंडस्ट्रीत मोठा धक्का बसला. एक वेळ अशी आली की ते दिल्लीहून बंगळुरूला गेले असताना विमानतळावर त्यांना घ्यायला कोणीही आलं नाही. इंडस्ट्रीतील लोकांनी त्यांच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली होती, असंही अनिल कपूर यांनी सांगितलं.

हा प्रसंग त्यांच्या वडिलांसाठी अत्यंत वेदनादायक होता. त्या वेळी ते पूर्णपणे खचले होते आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते, असा भावनिक खुलासा अनिल कपूर यांनी केला. या घटनेने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आणि त्यानंतरच त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला, असंही त्यांनी सांगितलं.
राजेश खन्नांच्या एका फ्लॉप चित्रपटामुळे कपूर कुटुंबाच्या आयुष्यात निर्माण झालेला हा टर्निंग पॉइंट आजही अनिल कपूर यांच्या मनात जिवंत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडच्या पडद्यामागच्या कठोर वास्तवावर चर्चा सुरू झाली आहे.