लाडकी बहीण योजना! अपात्र महिलांना दिलासा? 1500 रुपये पुन्हा मिळणार?

पुणे: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत अपात्र ठरलेल्या लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. कागदपत्रांतील चुका किंवा ई-केवायसी न झाल्यामुळे ज्यांचा 1500 रुपयांचा मासिक हप्ता बंद झाला आहे, त्या महिलांना आता पुन्हा एक संधी मिळण्याची शक्यता आहे.

पडताळणी प्रक्रियेनंतर मोठ्या प्रमाणावर महिलांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. मात्र, अनेक महिलांनी तांत्रिक अडचणी, चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे अन्याय झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपात्र महिलांना अपील करण्याची संधी दिली जाऊ शकते. या प्रक्रियेत संबंधित महिलांना आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली पात्रता पुन्हा सिद्ध करता येणार आहे. त्यामुळे ज्यांचा लाभ बंद झाला आहे, त्यांचा १५०० रुपयांचा हप्ता पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तसंच, ई-केवायसी पूर्ण न झालेल्या महिलांसाठी मुदतवाढ देण्याबाबतही विचार सुरू असल्याचं समजत आहे. मात्र, याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.

सरकारकडून लवकरच अपील प्रक्रियेचे नियम, अटी आणि कालमर्यादा जाहीर होण्याची शक्यता असून, या निर्णयामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो.