भोरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; गावात कडकडीत बंद आणि संतापाचा उद्रेक

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेनंतर संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ गावात आज कडकडीत बंद पाळण्यात आला असून ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले.

स्थानिकांच्या मते, आरोपीने “वासरू दाखवतो” असे सांगून मुलीला गोठ्यात नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली. नंतर मृतदेह लपवण्यात आला. मुलगी काही वेळ दिसली नाही म्हणून शोध घेतल्यानंतर तिचा मृतदेह आढळून आला. सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा प्रकार उघड झाल्याने परिसर हादरला आहे.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. आरोपीला तात्काळ फाशी द्या, अन्यथा त्याला आमच्या हवाली करा, अशी आक्रमक मागणी नागरिकांनी केली. महिलांनीही मोठ्या प्रमाणावर आंदोलनात सहभाग घेत संताप व्यक्त केला.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

या घटनेवरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.