रिक्षाचालकांना मोठा दिलासा; मराठी सक्तीबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय…

मुंबई : राज्यात टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा बंधनकारक करण्याच्या निर्णयाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने घेतलेल्या बैठकीत १ मे २०२६ पासून सक्ती लागू न करण्याचा निर्णय घेत चालकांना मोठा दिलासा दिला आहे.

यापूर्वी महाराष्ट्र दिनापासून विशेषतः मुंबईतील रिक्षाचालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात येणार होते. मात्र नव्या निर्णयानुसार, १ मेपासून कोणतीही सक्ती केली जाणार नाही.
या निर्णयामुळे मराठी न बोलणाऱ्या चालकांमध्ये असलेली परवाना रद्द होण्याची भीती आणि कारवाईची शक्यता सध्या टळली आहे. प्रशासनाने अंमलबजावणीची घाई न करता चालकांना तयारीसाठी वेळ देण्याची भूमिका घेतली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, चालकांना आता १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनापर्यंत कोणावरही कठोर कारवाई केली जाणार नाही, असे संकेत आहेत.

रिक्षाचालक संघटनांनी संपाचा इशारा दिल्यानंतर आणि प्रत्यक्ष अडचणी मांडल्यानंतर सरकारने ही नरम भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबतचा अंतिम आणि अधिकृत निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा शिकणे आवश्यक आहे. दिलेली मुदत केवळ वेळकाढूपणा नसून भाषा शिकण्यासाठी वापरली जावी.
बैठकीत कामगार नेते शशांक राव यांच्यासह इतर प्रतिनिधींनी मराठी शिकण्यास सहमती दर्शवली. चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी संघटनांकडून वर्ग सुरू करण्याची तयारी दाखवण्यात आली असून, सरकारकडूनही मार्गदर्शन दिले जाणार आहे.
सध्या परवाने रद्द होण्याची शक्यता कमी झाली असली तरी, मुदत संपल्यानंतर नियमांचे पालन अनिवार्य असणार आहे. मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी प्रशासन आणि संघटना आता एकत्रितपणे प्रयत्न करणार आहेत.