बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ले अन्… मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; परिसरात हळहळ


मुंबई : रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालेल्या संशयित अन्नविषबाधेत एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पायधुनी परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता अब्दुल्ला डोकाडिया (४०), त्यांची पत्नी नसरीन (३५), मुलगी आयशा (१६) आणि जैनब (१३) यांनी नातेवाईकांसोबत रात्रीचे जेवण केले होते. या जेवणात बिर्याणीचा समावेश होता. जेवणानंतर नातेवाईक घरी परतले.

यानंतर रात्री १ ते १.३० च्या दरम्यान कुटुंबातील चौघांनी कलिंगड खाल्ले. काही तासांतच त्यांच्या प्रकृतीत बिघाड होऊ लागला. २६ एप्रिल रोजी पहाटे ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला.

प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना तातडीने जे.जे. रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली. सर्वप्रथम सकाळी १०.१५ वाजता जैनब (१३) हिचा मृत्यू झाला. त्यानंतर दिवसभरात आई आणि मोठ्या मुलीचा मृत्यू झाला, तर रात्री सुमारे १०.३० वाजता कुटुंबप्रमुख अब्दुल्ला यांचेही निधन झाले.

घटनेची माहिती मिळताच जे.जे. मार्ग पोलीस यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, बिर्याणी आणि कलिंगड यांच्या सेवनानंतर ही विषबाधा झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

मात्र, अन्नामध्ये कोणतेही विषारी पदार्थ मिसळले गेले होते का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू असून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!