“नोकरी लावतो मंत्रालयात” या एका वाक्यावर विश्वास; महिलेनं गमावले 46 लाख, नेमकं काय घडलं?


नाशिक : मंत्रालयातील उच्च अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचा बनाव करून एका भामट्याने मुंबईतील महिलेसह तिच्या नातेवाईकांची तब्बल ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ठाणे जिल्हा येथे घडली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील एका आरोपीने आपण मंत्रालयात उच्च पदावर कार्यरत असल्याचे सांगत भांडुप येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेला विश्वासात घेतले. त्यानंतर तिच्यासह परिचितांना सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने बनावट सरकारी कागदपत्रे तयार करून त्यावर खोट्या सह्या आणि शिक्के मारत ती खरी असल्याचे भासवले. त्यानंतर वेळोवेळी पैशांची मागणी करत त्याने संबंधित महिलेकडून ३५ लाख २५ हजार रुपये, तर तिच्या ओळखीच्या दुसऱ्या व्यक्तीकडून १४ लाख रुपये उकळले. ही रक्कम डोंबिवली येथील एका कार्यालयात स्वीकारण्यात आली.

हा प्रकार जून २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत सुरू होता. मात्र दिलेल्या मुदतीनंतरही नोकरी मिळाली नाही आणि आरोपीने टाळाटाळ सुरू केल्याने पीडितांना संशय आला. पैशांची मागणी केल्यानंतर आरोपीने केवळ ३.२५ लाख रुपये परत केले, तर उर्वरित रक्कम देण्यास नकार दिला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!