१ मेपासून महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य; सरकारचा कडक निर्णय, चालकांचा संपाचा इशारा


मुंबई : महाराष्ट्र राज्यात आता टॅक्सी चालक, रिक्षाचालक,ओला आणि उबर चालकांनी प्रवाशांशी मराठीत बोलणे सक्तीचे करण्यात आले आहे. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात राज्य सरकारने आता पावले उचलली आहेत.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक आयोजित केली आहे. दुसरीकडे या मराठी भाषेच्या सक्ती विरोधात रिक्षा चालकांनी ४ मे पासून संपाचा इशारा दिला आहे.

शासनाने २०१९ मध्येच याबाबतचा अधिकृत आदेश काढला होता. मात्र, ओला , उबर, ई-बाईक तसेच नेहमीच्या रिक्षा आणि टॅक्सी चालवणारे अनेक परप्रांतीय चालक प्रवाशांसोबत स्थानिक भाषेत बोलत नसल्याच्या वाढत्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. हीच बाब लक्षात घेऊन आता राज्य सरकारने या प्रश्नावर गंभीर लक्ष केंद्रित केले असून जुन्या नियमाची नव्याने अंमलबजावणी करण्याचा विडा उचलला आहे.

येत्या १ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र दिन’चे निमित्त साधून या निर्णयाची प्रत्यक्ष आणि काटेकोर सुरुवात केली जाणार आहे. नुकताच आपल्या मातृभाषेला ‘अभिजात भाषा’ हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, केवळ कायद्याचा बडगा न उगारता बाहेरील राज्यातून आलेल्या चालकांच्या मनात आपल्या भाषेबद्दल खऱ्या अर्थाने प्रेम आणि आदर निर्माण व्हावा, असा शासनाचा मुख्य उद्देश आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!