धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा; एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०१.७७ टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गतवर्षी हा साठा ५५१.८६ टीएमसी होता. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसाच्या अनियमतेतमुळे पुढील वर्षी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा आणि एल-निनो प्रभावामुळे संभाव्य परिणामांची माहिती दिली.

एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात २०१४ मध्ये १२ टक्के तर २०१५ मध्ये सुमारे १४ टक्के घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली होती. १५ ऑक्टोबर २०१४ रोजी ८७२ टीएमसी तर याच दिवशी २०१५ ला ६२५ टीएमसी पाणीसाठा होता. त्या तुलनेत २०२५ मध्ये १५ ऑक्टोबरला १३३०.९७ टीएमसी पाणीसाठा होता. हा पाणीसाठा २१ एप्रिल २०२६ रोजी ६५३.६३ टीएमसी आहे. गतवर्षीच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १०१.७७ टीएससी पाणीसाठा अधिकचा आहे.

यावर राज्यातील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून ऑगस्ट २०२६ अखेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने काटकसरीच्या उपायोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यासोबतच एल-निनोच्या प्रभावामुळे या वर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने पुढील वर्षी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने आतापासून पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
महसूल विभागनिहाय पाणीसाठा (कंसात धरण संख्या) यंदाचा उपयुक्त पाणीसाठा, गतवर्षीचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
नागपूर – (३८७) ८०.७९, ६३.४०,
अमरावती – (२७६) ७३.७२, ६५.१३.
छत्रपती संभाजीनगर – (९२९) १२९.३७, ९७.०९.
नाशिक – (५३९) १०१.९६, ८९.२८.
पुणे – (७२४) २०६.५५, १७४.०४.
कोकण – (१७३) ६१.२४, ६२.९२.
एकूण – (३०२८) ६५३.६३, ५५१.८६.
राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा, गतवर्षीचा पाणीसाठा (टिएमसीमध्ये) या क्रमाने..
कोयना : ३३.६२, ३६.७६ . जायकवाडी : ४२.०३, ३४.४४. उजनी : १३.३९, (०) पेंच प्रकल्प समूह : २६.५७, २६.३५. इसापूर : २१.४५, १७.८२. भातसा : १५.७०, १४.९१. गोसीखुर्द : १४.३१, ५.९३. खडकवासला धरण समूह : ११.३२, ९.८२. मुळा : ९.५४, १०.५३. अप्पर वर्धा : १०.२१, ९.५३. अप्पर वैतरणा : ६.५२, ५.९५, भंडारदरा : ५.२५, ६.०४ टिएमसी.