मुंबई–पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! दोन दिवस मार्ग बंद, ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग…


पुणे : यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. डोंगरगाव ते कुसगाव परिसरात उभारण्यात आलेल्या नव्या पुलाच्या रंगकामासह शटरिंग काढण्याच्या तांत्रिक कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कडून दोन दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

या कामादरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहतूक ठराविक वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (२३ एप्रिल) आणि शुक्रवार (२४ एप्रिल) या दोन दिवसांत दुपारी १२ ते ३ या वेळेत यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर विशेष कामे केली जाणार आहेत.

किमी ५८/५०० जवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने दररोज तीन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात मुंबई आणि पुण्याकडे जाणारी अवजड तसेच हलकी वाहने महामार्गावर थांबवून त्यांना पर्यायी मार्गांकडे वळवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी मुंबईकडे जाणारी मार्गिका बंद ठेवण्यात येणार आहे, तर २४ एप्रिल रोजी पुण्याकडे येणारी वाहतूक रोखली जाणार आहे.

प्रवाशांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आगाऊ सूचना देण्यात आली असून, या कामांमुळे प्रवासाचा वेळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गुरुवारी दुपारी मुंबईकडे जाणारी वाहने किवळे आणि देहूरोड मार्गे तळेगावहून राष्ट्रीय महामार्ग ४८ वर वळवण्यात येतील आणि पुढे कुसगाव टोल नाका येथे पुन्हा द्रुतगती मार्गावर सोडण्यात येईल.

तसेच, शुक्रवारी पुण्याकडे येणारी वाहतूक कुसगाव टोल प्लाझावरून जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर वळवली जाईल आणि पुढे किवळेमार्गे पुण्यात प्रवेश दिला जाईल. या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!