उष्णतेनंतर आता पावसाचा तडाखा, राज्यात पुढील 5 दिवस वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट…


पुणे : भारतीय हवामान विभागाने 20 एप्रिल 2026 रोजी जाहीर केलेल्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार राज्यात हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. 20 ते 24 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या अंदाजानंतर मुंबई येथील मंत्रालयाकडूनही तातडीचा इशारा जारी करण्यात आला आहे. पुढील तीन तासांत मुंबई, उपनगर, पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांतील काही भागांत जोरदार वाऱ्यासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनाही होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, यवतमाळमध्ये दिवसभर ढगाळ वातावरणानंतर रात्री अचानक हवामानात मोठा बदल झाला. जोरदार वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने अनेक भागांना झोडपले. या बदलामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. याशिवाय आंबा आणि उन्हाळी तीळ पिकांना नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

परभणी जिल्ह्यात दिवसभरच्या कडाक्याच्या उष्णतेनंतर मध्यरात्रीच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.

नागरिकांनी विजांचा कडकडाट ऐकू येताच तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे, तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर शक्यतो करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रशासनाकडून ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागांना जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले असून शेतकऱ्यांनी या कालावधीत शेतीकाम टाळावे. तसेच मोठ्या गर्दीचे कार्यक्रम पुढे ढकलावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मात्र, या वादळी वाऱ्यांमुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला असून ग्रामीण भागातील शेतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. फळबागा आणि भाजीपाला पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. सततच्या वादळी पावसामुळे गावरान आंब्याचे मोठे नुकसान झाले असून पुढील उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!